दिनेश कार्तिकची वन-डे क्रिकेटमधली कारकिर्द जवळपास संपुष्टात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शुक्रवारी निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-२० आणि पाच वन-डे सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेसाठी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे भविष्यकाळात कार्तिकची वन-डे कारकिर्द संपुष्टात आल्यात जमा आहे. यापुढे त्याचा टी-२० क्रिकेटसाठी विचार केला जाईल असं खळबळजनक विधान भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी केलं आहे.

एका संकेतस्थळाशी मांजरेकर दिनेश कार्तिकच्या संघात समावेश न होण्याबद्दल बोलत होते. मांजरेकर म्हणाले की , ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे मालिकेसाठी संघात निवड न झाल्यामुळे दिनेश कार्तिकच्या चाहत्यांना वाईट वाटणं साहजिक आहे. आतापर्यंत त्याला ज्या ज्या सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, त्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. मात्र वन-डे मालिकेसाठी निवड न झाल्यामुळे यापुढे दिनेश कार्तिकचा फक्त टी-२० मालिकेसाठी विचार केला जाईल. त्याची वन-डे क्रिकेटमधली कारकिर्द आता जवळपास संपुष्टात आली आहे. ‘

२४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत भारत टी-२० आणि ५ वन-डे सामने खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारताला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम षटकात मोक्याच्या क्षणी एक धाव न काढल्यामुळे दिनेश कार्तिक टीकेचा धनी बनला होता.