IPL 2020 : ‘या’ कारणामुळं दिनेश कार्तिकनं सोडलं कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद, ‘या’ दिग्गजाला मिळणार संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मुंबई इंडियन्स विरुद्ध महत्त्वपूर्ण सामना होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या टीममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी आता इंग्लंडचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज इयोन मॉर्गन या संघाचा कार्यभार स्वीकारतील. आयपीएल 2020 मध्ये कोलकाता टीम पॉइंट अंकामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. मात्र, फलंदाज म्हणून कामगिरी करून दिनेश कार्तिक संघाला प्रेरणा देण्यास असमर्थ ठरला आणि कर्णधार म्हणून त्याच्या अनेक निर्णयावरही टीकाही झाली. इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात कोलकाताचा सामना आज मुंबई इंडियन्सशी होईल.

कार्तिक म्हणाला की, मला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं आहे

यासंदर्भात कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी वेंकी यांनी सांगितले आहे की, दिनेश कार्तिक आणि इयोन मॉर्गन यांनी या स्पर्धेदरम्यान एकत्र काम केले आहे, त्यामुळे आता इयोन कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारेल, ही जबाबदारी बदलण्याची बाब आहे. निवेदनानुसार, दिनेश कार्तिकने केकेआर व्यवस्थापनाला सांगितले की, आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला संघाचे नेतृत्व इयोन मॉर्गनकडे सोपवायचे आहे. वेंकी म्हणाले की, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला दिनेश कार्तिकसारखा कर्णधार मिळाला ज्याने नेहमीच संघाला प्रथम स्थान दिले. असा निर्णय घेण्यास धैर्याची गरज लागते. त्याच्या निर्णयामुळे आम्हाला आश्चर्य वाटले पण आम्ही त्याचा आदर करतो.

7 सामन्यात 15 च्या सरासरीने रन

या सीजनमध्ये फलंदाज म्हणून दिनेश कार्तिकची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या संघाच्या 7 सामन्यांत 15.42 च्या सरासरीने आणि 136.70 च्या स्ट्राइक रेटने केवळ 108 रन केले आहेत. यावेळी त्याच्या फलंदाजीतून केवळ अर्धशतक झाले आहे. त्याचे सर्वोच्च स्कोर 58 रन होते.