ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का ! TMC चे नेते दिनेश त्रिवेदी यांचा भाजपमध्ये प्रवेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Legislative Assembly Election 2021) काही दिवसांवर आली आहे. अशात आता मोठी राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

दिनेश त्रिवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना टीएमसीच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच आरोप करत टीका केली. मी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरीही मी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय राहिल असंही ते म्हणाले.

‘बंगालमध्ये टीमसीला नाकारलं, ममता बॅनर्जी आपल्या आदर्शांना विसरल्या’

त्रिवेदी म्हणाले, बंगालमध्ये टीमसीला नाकारलं आहे. बंगालच्या जनतेला आता केवळ विकास हवा आहे. भ्रष्टाचार व हिंसा नको आहे. बंगालची जनता प्रत्यक्षात बदल घडवायला तयार आहे. राजकारण काही खेळ नाही, गंभीर विषय आहे. ममता बॅनर्जी आपल्या आदर्शांना विसरल्या आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

‘जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर निषेध केल्यानं माझाच निषेध झाला’

पुढं बोलताना त्रिवेदी म्हणाले, मी जे करतो ते मनापासून करतो मी आधी काही ठरवलेलं नव्हतं. भावनिक नात असणाऱ्या पक्षातून बाहेर पडताना तुमच्याकडे काही तरी ठोस कारण असलं पाहिजे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर मी निषेध केल्यानं माझाच निषेध करण्यात आला. आपण छळ का करावा. हिंसाचाराला कोणतीच जागा नाही. बंगाली शांतताप्रिय आहेत.