सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारला टार्गेट करत अनेक आरोप केले होते. परंतु, त्यांच्या या आरोपातून अभिनेता दिनो मोर्याने हवाच काढली आहे. दिनो मोर्याने राणेंच्या आरोपांना सणसणीत उत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राणे यांनी अभिनेता दिनो मौर्याचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते.

भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांना दिनो मोर्याने ट्विट करून राणे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सुशांत सिंह राजपूतसाठी 13 जून रोजी कोणत्याही पार्टीचं आयोजन करण्यात आले नव्हते, असा खुलासा दिनो मोर्याने केला आहे. तसेच, कुणावर आरोप करण्यापूर्वी किमान सत्य परिस्थिती आणि अचूक माहिती तरी जाणून घ्या. उगाच कोणावरही आरोप करू नका, असे म्हणत दिनो मोर्याने राणांना फटकारलं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, कृपा करून माझे नाव यात घेऊ नका, अशी विनंतीही दिनो मोर्याने केली आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे ?
दिनो मोर्याच्या घरी अनेक राजकीय नेत्यांचे येणे-जाणे सुरु होते. त्याच्या घरीच सुशांत आला होता. 13 तारखेला घरी पार्टी झाली होती. या पार्टीला कोणकोण होतं, त्यांची नाव का समोर आली नाहीत. त्यांना अटक का झाली नाही ? असे सवाल राणेंनी उपस्थित केले. तसेच दिनो मोर्याच्या घरी अनेक मंत्री हे का जातात. त्याच्या घरी एका मंत्र्यांची आणि सुशांतची भेट झाली होती आणि तिथून ते पार्टीला गेले होते. ते मंत्री कोण आहे ? अधिकारी त्यांना वाचवायचा प्रयत्न का करत आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.

https://twitter.com/DinoMorea9/status/1290658834084700161