Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड यांचे शक्तीप्रदर्शन करून थेट पक्षनेतृत्वाला संदेश; आता CM ठाकरे यांच्या निर्णयाकडे लक्ष

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड गेल्या 15 दिवसांपासून गायब होते. अखेर मंगळवारी (दि. 23) ते सर्वासमोर आले. तेंव्हा राठोड समर्थकांनी पोहरादेवीला गर्दी केली होती. यावेळी कोण आला रे कोण आला रे, बंजारा समाजाचा वाघ आला अशा घोषणा राठोड यांच्या समर्थकांनी दिल्या. माझा समाज माझ्या पाठिशी ठामपणे उभा आहे, असा स्पष्ट संदेश यातून राठोड यांनी त्यांचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्द्धव ठाकरे यांना दिल्याचे बोलले जात आहे. पोहरादेवीला शक्तिप्रदर्शन करून राठोड यांनी पक्षावर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राठोड गेल्या 15 दिवसांपासून राठोड बेपत्ता होते. ते समोर येत नसल्याने महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. राठोड यांची चौकशी व्हावी. तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. असे असताना आज सकाळी संजय राठोड सपत्नीक बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी आले होते. या अडचणीच्या काळात आपल कुटुंब पाठिशी असल्याचा स्पष्ट संदेश यातून राठोड यांनी दिला. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणत्या घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.