Lockdown in Maharashtra : विनाकारण फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. त्यामुळे आता शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुरुवारी दिले. दरम्यान, आंतरजिल्हा तसेच शहर, तालुक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे शिवाय नाकाबंदीच्या ठिकाणी अँटिजेन टेस्ट करण्याची सुविधाही करण्यात येणार आहे.

घरापासून १ किमी दूर जाणाऱ्यांवर कारवाई
राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधात सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजी भाजी खरेदीला मुभा देण्यात आली आहे. मात्र, काहींजण दूरवरून भाजी खरेदी करण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे काही वाहनधारक भाजी खरेदी, औषध खरेदीच्या नावाखाली शहरात फेरफटका मारतात. अशा वाहन चालकांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता भाजी मंडईच्या ठिकाणीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच घरापासून १ किमी दूर जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी घराजवळील दुकान, मेडिकल, मंडईत खरेदी करावी व कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे मॉर्निंग वॉक तसेच इव्हिनिंग वॉकच्या नावाखालीही अनेक जण सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडतात. तसेच गल्लीबोळातही गर्दी दिसून येते. मात्र आता ही गर्दीही कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. अशा ठिकाणी मोबाईल व्हॅनचा वापर करून पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत.

जिल्ह्यात येणाऱ्यांच्या तपासणीसाठी आठ नाके
अत्यावश्यक सेवांसाठीच जिल्हाअंतर्गत तसेच आंतर जिल्हा प्रवास सुरु आहे. मात्र तरीही काही जणांचे ये जा सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या मार्गांवर आठ ठिकाणी चेक पोस्ट नाके उभारले जाणार आहेत. यामध्ये किणी टोल नाका, कोगनोळी टोल नाका, अंकली पूल, आंबा (शाहूवाडी), गवसे (आजरा), शिनोळी (चंदगड), गगनबावडा व राधानगरी या चेकपोस्टचा समावेश आहे. याठिकाणी दोन शिफ्टमध्ये पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तपासणी करूनच वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे.