अपमानित झाल्याने ‘ठाकरे’चे दिग्दर्शक अभिजित पानसे सिनेमागृहातून तडकाफडकी बाहेर ? 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘ठाकरे’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे अपमानित झाल्याची चर्चा असल्याचे समजत आहे. मुंबईतील अ‍ॅट्रिया सिनेमागृहात सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू होते. ‘ठाकरे’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. यादरम्यान चित्रपटाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. परंतु तरीही पानसे आपल्या कुटुंबीयांसह सिनेमागृहातून निघून गेल्याचे समजत आहे.

अभिजित पानसे अपमानित झाल्याने सिनेमागृहातून निघून गेल्याचे सांगण्यात आल्यानंतर मात्र  विविध वृत्त वाहिन्यांनी या घटनेची वेगवेगळी कारणे  सांगितल्याचे समजत आहे. एका वृत्त वाहिनीने सिनेमागृहात कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे हे सिनेमागृहातून बाहेर गेल्याचे सांगितले. तर स्क्रिनिंगसाठी ते उशिरा पोहोचल्यामुळे राऊत यांच्याशी त्यांची बाचाबाची झाल्याचे काहींनी म्हटल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याने पानसे यांनी हे पाऊल उचलल्याचे काही वृत्त वाहिन्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे.

अशा प्रकारे अभिजित पानसे अपमानित झाल्याने सिनेमागृहातून निघून गेल्यानंतर जरी वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत तरीदेखील पानसे हे नेमके कशामुळे संतापले आणि तडकाफडकी सिनेमागृहातून निघून गेले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

‘ठाकरे’चा ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ पहाटे ४:१५ वाजता

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी ने साकारली आहे. बाळासाहेब त्यांच्या कणखर आणि बोलण्यातील शैलीमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहेच. तसंच त्यांच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दकीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता ‘ठाकरे’ चित्रपटाला घेऊन एक नवी बातमी समोर येत आहे.  हातात आलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचा ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ पहाटे ४:१५ वाजता प्रदर्शित होणार आहे.