निवडणूकीत लहानात लहान गोष्टीकडेही गांभीर्याने पाहा : पोलीस महासंचालक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- २६/११ ला आम्ही विसरलो नाही. त्यामुळे मुंबईच्या सर्व सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतलेला आहे. सुरक्षेसंदर्भातील सर्व उपाय केलेले आहेत. त्यासोबतच राज्यात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसारच पोलीस काम करणार आहेत. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेची व्यवस्थित तयारी करण्यात आली आहे. लहानात लहान गोष्टी सुद्धा गांभीर्याने विचारात घेतल्या जातील आणि त्यावर त्वरीत कारवाई केली जाईल. असे राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल बुधवारी पुण्यात म्हणाले.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आदी उपस्थित होते.

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्हा तसेच पुणे शहर आयुक्तालय आणि पिंपरी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि संवेदनशील मतदारसंघाची माहिती घेतली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच एल्गार प्रकरणाच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती. मी मुख्यमंत्री असतो तर पोलीस आयुक्तांना निलंबित केले असते,’ असे विधान पवार यांनी केले. यावर जयस्वाल यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एल्गार परिषदेचा तपास कायद्याच्या कक्षेत प्रामाणिकपणे झालेला आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारावरच कारवाई झालेली आहे.

त्यासोबतच पुण्यात मूकबधीरांवर झालेल्या लाठीरमाराच्या प्रकरणाकडे पोलीस महासंचालक यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर यावर अहवाल सादर करण्याच्या सुचना पोलीस आयुक्तांना त्यांनी दिल्या.