सलाम ! Down To Earth… पोलिसांच्या भावनेचा अन वडिलधाऱ्यांचा आदर करणारे पहिले DG

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस विभागा बद्दल समाजात कुठलाही समज असो परंतु आजही पोलीस खात्यात अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि अत्यंत साधे राहणीमान असणारे अधिकारी दिसून येतात. याचाच प्रत्यय काल शिर्डीमध्ये आला. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी बिझी शेड्यूलमधून वेळ काढत आपल्या चालकाच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला. एवढेच नाहीत तर चालकाच्या वृद्ध वडिलांचे आशीर्वाद देखील घेतले. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन जेष्ठांचे आशीर्वाद घेणारे दत्ता पडसलगीकर हे पहिलेच महासंचालक आहेत.

अधिकारी म्हटलं की, आदेश सोडणारा अस सर्वश्रृत आहे. मात्र, एखादा आयपीएस अधिकारी आपण सजग नागरिक असल्याची भूमिका पार पाडतो आणि सर्वांनाच आपला वेगळा विचार करायला लावतो. असाच एक अधिकारी म्हणजे महाऱाष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे येणार असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे दत्ता पडसलगीकर देखील काल (शुक्रवार) शिर्डी येथे आले होते. एखाद्या मोठ्या नेत्याचा बंदोबस्त असल्यानंतर अधिकाऱ्यांना खाण्या पिण्याचे देखील भान रहात नाही. परंतु पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी बंदोबस्तातून वेळात वेळ काढून चालक राजू घुगे यांच्या गावाला सदिच्छ भेट दिली.

महासंचालकांनी राजू घुगे यांच्या गावाला सदिच्छ भेट देऊन घुगे यांच्या कुटुंबासमवेत काही क्षण घालवले. गावकऱ्यांनी देखील मोठा अधिकारी आपल्या गावात आला आहे म्हटल्यावर त्यांचा फेटा घालून सत्कार केला. गावकऱ्यांच्या सत्काराचा मान राखत महासंचालकांनी गावकऱ्यांचे देखील अभार मानले. राजू घुगे यांच्या वडीलांनी देखील त्याचा सत्कार केला. सत्कारानंतर दत्ता पडसलगीकर यांनी वडिलांना वाकून नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. याच कृतीतून पडसलगीकरांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. माणूस मोठा होतो तो त्याच्या कृतीने हेच त्यांनी आपल्या कृतीतून उपस्थितांना दाखवून दिले. एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेट देणारा पोलीस दलातील पहिलेच अधिकारी दत्ता पडसलगीकर असतील.