परमबीर सिंग यांच्यानंतर आता पोलीस महासंचालकांचा लेटर बॉम्ब, गृहखात्यात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले. यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याला पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगितले आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याला पत्र लिहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात नुकतीच याचिकात दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले 100 कोटी वसूलीचे आरोप मागे घ्यावेत, यासाठी पोलीस महासंचालक संजय पांडे आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सरकारला पत्र लिहून आपण परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचे सांगत चौकशी करण्यास नकार दिला आहे.

राज्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांना परमबीर सिंग यांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, आता त्यांनी सरकारला पत्र लिहून परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालायत बुधवारी (दि.5) सुनावणी होणार आहे. यापूर्वीच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी चौकशी करण्यास नकार दिला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध असलेल्या आरोपींसोबत कनेक्शन असल्याचा आरोप गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला. अनुप डांगे यांनी लेखी तक्ररीत म्हटले की, अंडरवर्ल्डशी थेट संबंध असलेले आरोपी जितेंद्र चंदेरलाल नवलानी, भरत शहा, सनी देवान यांच्याशी परमबीर सिंग यांचे कनेक्शन आहे. तसेच पुर्ननियुक्ती करण्यासाठी परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप डांगे यांनी केला. डांगे यांनी लेखी तक्रार केल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी गृह खात्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.