सुवर्ण व्यावसायिक आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना यांचे 86 व्या वर्षी निधन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  सुवर्ण व्यावसायिक आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक, स्वर्णनगरी जळगावचे नाव संपूर्ण देशात पोहाेचविणारे आणि शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल सी. बाफना (वय 86) यांचे आज (सोमवार) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाफना यांच्या निधनामुळं हजारोंचा आधारवड हरपला अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

प्रकृती अस्वस्थ असल्यानं गेल्या काही दिवसांपासून बाफना यांच्यावर उपचार सुरू होते. बाफना यांच्या निधनामुळं जळगाव आणि परिसरातील व्यापार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सुरुवातीच्या काळात जळगावमध्ये एक छोटे ज्वेलर्सचे दुकान उघडून त्यांनी सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अपार कष्ट, सचोटी, विश्वास आणि पारदर्शकतेच्या बळावर त्यांनी जळगावातील सोने देशभर पोहाेचविले. हजारोंना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. नाशिक, औरंगाबादसह इतर शहरांमध्ये त्यांनी बाफना ज्वेलर्सच्या शाखा सुरू केल्या. रतनलाल बाफना यांनी सामाजिक बांधिलकी जपत संकटात असलेल्यांना आधार दिला, तर अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतदेखील केली. जळगावजवळच गोशाळा सुरू करून त्यांनी मुक्या गुरांनादेखील आधार दिला होता. बाफना यांनी जैन समाजासाठीदेखील मोठे योगदान दिलेले आहे. त्यांनी जैन धर्मीयांच्या साधू संत, मुनी यांच्यासाठी निवासस्थान आणि धर्मशाळा सुरू केल्या. बाफना यांच्या निधनामुळं हजारोंचा आधारवड हरपला, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.