प्रसिद्ध दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदने दत्तक घेतलेल्या मुलाची आई आली परत, मागितला स्वतःचा मुलगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना त्याला एका विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. सिद्धार्थला मुलासाठी आता न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. या मुलाला गेल्या वर्षी त्याने दत्तक घेतले होते. पण आता त्याची खरी आई परत आली असून तीने मुलाला परत मागितले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बोरिवली रेल्वे स्थानकात मुंबई पोलिसांना मानसिकदृष्ट्या आजारी असलेली एक महिला आपल्या बाळाला दूध पाजताना दिसली. पोलिसांनी महिलेची सखोल चौकशी केली असता मुलाच्या शरीरावर जखमांचे व्रण दिसले होते. यानंतर पोलिसांनी मुलाला बाल कल्याण समितीकडे सोपवले आणि मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या महिलेला कर्जतच्या श्रद्धा पुनर्वसन फाऊंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल केले. आईवर उपचार सुरू असताना, बालकल्याण समितीने कुटुंब सेवा केंद्राच्या मदतीने मुलाला अनाथ मानले आणि त्याला अनाथ आश्रमात पाठवले होते. त्या आश्रमातून सिद्धार्थने मुलाला दत्तक घेतले.

त्यानंतर ते बाळ आणि सिद्धार्थ एकमेकांसोबत सतत राहतात. सिद्धार्थ भावनिकरित्या मुलामध्ये गुंतून गेला होता. पण अचानक एक दिवस मुलाची खरी आई परतली. पुनर्वसन केंद्राने कुटुंब सेवा केंद्राला महिला ठिक झाल्याचे प्रमाणपत्रही दिले आहे. आता बाल कल्याण समितीने मुलाची आणि महिलेची डीएनए चाचणी करण्यास सांगितले आहे. जेजे इस्पितळात ही चाचणी केली असता हे मुल त्या महिलेचे असल्याचे सिध्द झाले आहे. आता हे प्रकरण पोलिसांत पोहचले आहे. प्रकरणात सिद्धार्थ आनंद त्याची ओळख वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात तो काही लोकांसह बालकल्याण समिती कार्यालयात गेला. मात्र समितीने त्याला सांगितले की, मुलाच्या आईला आपला मुलगा परत मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण ती आता पूर्णपणे ठीक झाली आहे. बालकल्याण समितीने पोलिसांनाही या संदर्भात पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.