प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे पुण्यात 78 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुवर्ण कमळ विजेत्या निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन देवराई, दोघी, दहावी फ, कासव अशा अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे (वय ७८)यांचे आज सकाळी निधन झाले. सुमित्रा भावे या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या दहावी फ, वास्तु पुरुष,देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, संहिता, घो मला असला हवा, कासव, अस्तु हे चित्रपट गाजले. त्यांनी दिग्दर्शित केलेला दिठी हा अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यांच्या चित्रपटांचा चाहता वर्ग मोठा आहे.

सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. शिक्षणानंतर त्यांनी अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये विना मोबदला काम केले. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे त्यांनी ठरविले होते. चित्रपट माध्यमांची ताकद ओळखून त्या या क्षेत्राकडे वळल्या. सुरुवातीला त्यांनी एक लघुपट तयार केला होता.

त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून त्या चित्रपट क्षेत्राकडे वळल्या. अगदी विजय तेंडुलकरांपासून सचिन तेंडुलकरापर्यंत तसेच अनेक नवोदित कलावंतांनी त्यांच्या चित्रपटात काम कामे केली. अतिशय ह्दयस्पर्शी हाताळणी आणि वास्तव मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. कमीतकमी बजेटमध्ये त्यांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी आपल्या चित्रपटातून अनेक सामाजिक विषय हाताळले. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या चित्रपटसृष्टी कार्यरत होत्या.

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट
अस्तु
एक कप च्या
कासव
घो मला असला हवा
जिंदगी जिंदाबाद (हिंदी)
दहावी फ
देवराई
दोघी
नितळ
फिर जिंदगी (हिंदी लघुपट)
बाधा
बेवक्त बारिश (हिंदी लघुपट)
मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट)
वास्तुपुरुष
संहिता
हा भारत माझा