देशातील विमान सेवा 17 मे पर्यंत बंदच राहणार, DGCA कडून आदेश जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरी उड्डाण संचालनालय म्हणजेच डीजीसीएने विमान कंपन्यांसाठी आदेश जारी केला आहे. सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं 17 मे पर्यंत बंदच राहतील, असं डीजीसीएकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालनयाने देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर डीजीसीएने हा आदेश जारी केला आहे. यापूर्वी 3 मेपर्यंत विमान उड्डाणं बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.

देशामध्ये 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून देशातील सर्व विमान उड्डाणे बंद आहेत. त्यानंतर 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला होता. या लॉकडाऊननंतर प्रवासी वाहतूक सुरु करण्याची प्रवानगी मिळेल, अशी विमान कंपन्यांना आपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारने सामुदायिक संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या शिफारसीवर सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी हरदीप सिंह पुरी यांनी याबाबत विविध ट्विट केले होते. संबंधित सूचनाही विमान वाहक कंपन्यांना देण्यात आल्या असल्याचं ते म्हणाले. कंपन्यांनी बुकिंग सुरु करण्यासाठी जरा संयम बाळगावा. कारण काही कंपन्यांकडून सरकारच्या नियमावलीची दखल घेतली गेली नसल्याचं दिसून येत आहे, असं ते म्हणाले. एक कंपनीने बुकिंग सुरु केल्याचे लक्षात येताच केंद्रीय मंत्र्यांनी याची दखल घेत संबंधित कंपनीला आदेश देतानाच, सेवा पूर्ववत करण्यासाठी बुकिंगला पुरेसा वेळ देण्यात येईल असे सांगण्यात आले होते.