केंद्र आणि राज्य सरकारांना आपत्ती व्यवस्थानचे पत्र, लॉकडाऊन 31 मेपर्यंत…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाने केंद्र आणि राज्य सरकारांना पत्र लिहून देशव्यापी लॉकडाऊन 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यास सांगितले आहे. दुसरीकडे सूत्रांची अशीही माहिती आहे की, सरकारने लॉकडाऊन मे महिन्याच्या अखेरपर्यंत जारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकर मार्गदर्शक सूचना जारी करून माहिती दिली जाईल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, भारतात आतापर्यंत एकुण 90,927 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तर 2872 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) पत्रात निर्देश दिले आहेत की, लॉकडाऊनच्या चौथा टप्पा 31 मे, 2020 पर्यंत जारी ठेवण्यात यावा. तसेच कोरोना व्हायरस महामारीचा संसर्ग रोखण्यासह आर्थिक व्यवहार खुले करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारी समिती (एईसी) ला सुद्धा निर्देश दिले आहेत.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा आज रात्री 9 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारने देशभरात लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविले आहे. सरकारने म्हटले आहे की, लवकरच नवे नियम जारी करण्यात येतील. यामध्ये आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी सूट देण्याची माहिती दिली जाऊ शकते. महाराष्ट्र, पंजाब, मिझोरामसह अनेक राज्यात अगोरदरच लॉकडाऊनचा कालवधी 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही राज्यांनी कर्फ्यूमध्ये सूट दिली आहे. परंतु, शाळा, कॉलेज, मॉल आणि सार्वजनिक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.