Coronavirus : वापरलेल्या मास्कची ‘विल्हेवाट’ सुरक्षितरित्या न लावल्यास मोठा धोका, तज्ञांचा इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण बाजारात मास्कच्या कमतरतेबद्दल बोलताना दिसत आहे. लाखोंच्या संख्येने मास्क उत्पादित केले जात असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. मात्र, वापरल्यानंतर मास्कचा हा साठा किंवा कचरा हाताळायचा कसे याबाबत कोणीच काही बोलत नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते कोरोनासोबत लढताना मास्कच्या कमतरतेच्या समस्येपेक्षा जास्त मोठी समस्या वापरल्यानंतर लाखो विषाणू आणि जिवाणूयुक्त झालेल्या त्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची आहे.

मास्कची योग्य विल्हेवाट लावणे ही आपली जबाबदारी
मास्क हा रुग्णालयातून निघणाऱ्या बायो मेडिकल वेस्ट या प्रकारात मोडणारा कचरा आहे. रुग्णालयातून निघणाऱ्या या कचऱ्याची विल्हेवाट लावायची एक पद्धत आहे. त्याचे काही नियम आहेत. मात्र सध्या मास्क सर्वसामान्य माणसांकडून वापरला जात असल्याने थोड्या प्रमाणात का होईना घराघरातून तो घटक बायो मेडिकल वेस्ट निघू लागला आहे. त्यामुळे स्वत:ची सुरक्षा म्हणून जे लोक मास्क वापरत आहेत. इतरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी, अशी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. तज्ञांच्या मते वापरलेले मास्क थेट घरातल्या डस्टबिनमध्ये टाकून मोकळे होता येणार नाही. वापरलेल्या मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी चार सुरक्षित पद्धती आहेत.

मास्कची विल्हेवाट लावण्याच्या 4 पद्धती
1. वापरलेल्या मास्कला पाण्यात 5 टक्के ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रव्यात 5 ते 10 मिनिट निर्जंतुक करा, त्यानंतर कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका
2. किंवा 1 टक्का सोडियम हायपोक्लोराइट आणि पाण्याचे द्रव वापरून त्यात मास्क निर्जंतुक करून मग कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका
3. अगर घराजवळ तुमच्या मालकीची मोकळी जागा असेल तर त्यात खोल खड्डा करून त्यात मास्क जमिनीत पुरावेत
4. सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे वापलेले मास्क सुरक्षितरित्या जाळावेत.
प्रत्येक मास्कचा कालावधी असतो.

तज्ज्ञांच्या मते सर्जिकल, ट्रिपल लेयर किंवा एन 95 सारखे उच्च श्रेणीचे मास्क यांची एक काळमर्यादा ठरलेली असते. त्यानंतर तो मास्क सुरक्षित रहात नाही. त्यामुळे त्या काळामर्य़ादेनंतर नवा मास्क वापरणे गरजेचेच ठरते. वापरल्यानंतर वापरणाऱ्यांच्या थुंकीतून लाखो विषाणू किंवा जिवाणू त्या मास्कच्या आतील बाजूस राहू शकतात. त्यामुळे मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.