महावितरणच्या दणक्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा अजित पवारांचे प्रयत्न

राहुरी : पोलिसनामा ऑनलाईन – महावितरणने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ७१.६८ लाख थकबाकीदारांना वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. सोमवारपासून पुढील कारवाईस सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच राहुरी येथील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरल्यास त्यावर शेतकऱ्यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत देण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच ग्रामपंचायतींनी शासकीय जमीन महाविरतणला उपलब्ध करून दिल्यास त्यांनाही दरवर्षी महावितरणकडून हक्काचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असेही पवार म्हणाले.

राहुरीत सहा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होते. अजित पवार म्हणाले, नगर जिल्ह्यात ४ हजार ९९८ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. जिल्ह्यात वसूल होणाऱ्या रकमेपैकी ६६ टक्के निधी वीजनिर्मितीच्या, वीज वितरणाच्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध केला जाईल. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत जिराईत जमीन शेतकऱ्यांनी महावितरणला उपलब्ध करून दिल्यास एकरी ३० हजार रुपये महावितरणकडून दिले जातील, असे पवार म्हणाले.

ग्रामपंचायतींनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायला हवेत त्यासाठी, ग्रामपंचायतीने महावितरणला शासकीय जमिनी उपलब्ध करून दिल्या तर दरवर्षी त्यांनाही उत्पन्नाचा एक निश्चित स्त्रोत उपलब्ध होईल. वांबोरी चारीच्या सुधारित दुसऱ्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.’ निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पवार यांनी दिले.

…. आता यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का
वांबोरी (ता. राहुरी) येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमस्थळी अजित पवार पोहोचले. त्यावेळी त्यांना अनेक लोक विनामास्क आल्याचे निदर्शनास आले. हे पाहून त्यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. ते म्हणाले की, कोरोनामुळे राज्यावर आर्थिक संकट आले आहे. कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. अनेक जण नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. हे बघा हे पठ्ठे येथे विनामास्क फिरत आहेत. आता यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का, अशा शब्दांत पवारांनी आपला संताप व्यक्त केला.