घर खरेदी करणार्‍यांसाठी ‘सुवर्णसंधी’ ! राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय ठरतोय फायदेशीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीचा मोठा बांधकाम व्यवसायाला बसला. त्याचा परिणाम राज्य सरकारचा महसुलावर पडला. म्हणून राज्य सरकारने बांधकाम व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहीर केल्यानंतर मागील दोन महिन्यांत दस्त नोंदणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जुलै महिन्यामध्ये राज्यात केवळ १ लाख ६५ हजार दस्त नोंदणी झाली होती. तर सप्टेंबर महिन्यात वाढ होऊन ती २ लाख ४० हजारांवर पोहचली आहे. तद्वतच, आता दसरा-दिवाळीत यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. त्यामुळे अल्प प्रमाणात दस्त नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ‘मिशन बिगेन’ अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालये सुरु झाली. मात्र, तरीही जून, जुलै महिन्यात अपेक्षित अशी दस्त नोंदणी झाली नव्हती. म्हणून राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यापासून डिसेंबर २०२० पर्यंत स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहीर केली. त्याचप्रमाणे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत दोन टक्के सवलत देण्याचे जाहीर केले. मागील वर्षीच्या तुलनेत अजूनही दस्त नोंदणी कमी असली तरी दस्त नोंदणीची वाढणारी संख्या समानधकारक आहे. राज्यातील सुरवातीचे तीन महिने दस्त नोंदणीत तब्बल ६० टक्क्यांची घट नोंदवली होती. ती आता ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी हीच ‘ती’ योग्य वेळ

राज्य सरकारने बांधकाम व्यवसायिक आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीत तीन टक्के सवलत दिल्याने चांगला फायदा झाला असून, दस्त नोंदणी आणि महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे राजस्थान व इतर काही राज्यांनी यासंदर्भात विचारणा केली आहे. ही तीन टक्क्यांची सवलत डिसेंबर अखेरपर्यंत असून, ग्राहकांना घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे, महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी म्हटले.

एप्रिल ते सप्टेंबर अखेरपर्यंत झालेली दस्त नोंदणी व प्राप्त झालेला महसूल

महिना दस्त नोंदणी महसूल (कोटीत)

एप्रिल ११३९ २७९.३९
मे ३९७६९ ४१४.७५
जून १५३१५५ १२६०.५४
जुलै १६५१३९ १३०९.९२
ऑगस्ट १८३५१५ १४१६.४५
सप्टेंबर २४०३३३ १५१४.७४

You might also like