कुणाल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागणार ? पक्ष श्रेष्ठींची अनुकूलता असल्याची चर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसतर्फे जिल्ह्यातून निवडून आलेले एकमेव आमदार कुणाल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भातील चर्चा ऐकायला मिळत आहेत. मागील दोन दिवसांपासून दिल्लीत मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासंदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कुणाल पाटील हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याविषयी पक्षात आदर असून त्याचा फायदा कुणाल पाटील होण्याची शक्यता आहे.

कुणाल पाटील हे जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहे. जिल्ह्यातून ते एकमेव आमदार असल्याने काँग्रेसने त्यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष शाम सनेर व धुळे मनपाचे विरोधी पक्षनेते साबीर शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन केली होती. त्यांच्या या मागणीला प्रदेशाध्यक्षांसह पक्षातील अन्य नेत्यांनी अनुकूलता दाखविली होती.

जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी शिष्टमंडळासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रातील नेते अहमद पटेल यांचीही भेट घेतली. या सर्व नेत्यांनी कुणाल पाटील यांना मंत्रीपद देण्यास अनुकुलता दर्शवली होती. तसेच दिल्लीत यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे आपले विचार पोहचवू असे आश्वासन दिले असल्याची चर्चा सध्या आहे. दरम्यान, कुणाल पाटील यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे खासगीत बोलले जात आहे. मात्र, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार असल्याने यावर बोलणे पदाधिकाऱ्यांनी टाळले आहे. परंतु कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाची तयारी सुरु केल्याचे पहायला मिळत आहे.

Visit : policenama.com