‘सिल्व्हर ओक’मध्ये पवार कुटुंबियांची चर्चा ! सर्व जण उपस्थित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय जमले आहेत. यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार हे सर्व निवास्थानी जमले असून त्यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रावाचे इतर कोणतेही नेते या चर्चेत उपस्थित नाही. नुकतेच राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की, लवकरच माध्यमांना सर्व माहिती दिली जाईल.

सध्या पवार कुटुंबीयांची सिल्व्हर ओकमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत केवळ पवार कुटुंबियांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. नेमकी काय चर्चा चालली आहे हे मात्र समोर आलेलं नाही. अजित पवारही अस्वस्थ असल्याचे दिसत आहेत. अखेर 19 तासांपासून अजित पवार अज्ञातवासात होते. कोणाशीही त्यांचा संपर्क होत नव्हता. 19 तासांनंतर ते अज्ञातवासातून बाहेर आल्याचे दिसत आहे.

सध्या सिल्व्हर ओकवर राष्ट्रावादीचे इतर कोणतेही नेते उपस्थित नाही. धनंजय मुंडे यांनी पवारांना भेट दिली आणि तेही तेथून बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “योग्य वेळ आल्यानंतर माध्यमांशी संपर्क साधला जाईल. सर्व योग्य ती माहिती माध्यमांना त्यावेळी दिली जाईल.” असं मुंडेंनी स्पष्ट केलं. आज दुपारनंतर पवार माध्यमांसमोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.