Coronavirus : ‘मिकोर मायकोसिस’ ठरतोय कोरोनाच्या रूग्णांसाठी घातक, 8 जणांना काढावे लागले डोळे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना विळखा घातला आहे. त्यातच आता नव्या आजाराच्या कचाट्यात अनेकजण सापडत आहेत. त्यामुळे योग्यवेळी उपचार न झाल्याने रुग्णांचा डोळा काढावा लागत आहे किंवा त्यांचा मृत्यू होत आहे. या आजाराचे नाव आहे मिकोर मायकोसिस.

गुजरातच्या सूरतमध्ये 15 दिवसांत 40 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये 8 रुग्णांचे डोळे काढावे लागले. मिकोर मायकोसिस हे एकप्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे. जे नाक आणि डोळ्यांच्या माध्यमातून होत असून, ते मेंदूपर्यंत जात आहे. त्यानंतर रुग्णाचा मृत्यु होतो. सूरतच्या किरण रुग्णालयात ईएनटी विशेषज्ञ डॉक्टर संकेत शाह यांनी सांगितले, की कोरोनातून बरे झाल्यानंतर फंगल इंफेक्शन आधी सायनसमध्ये होत असतो आणि 2 ते 4 दिवसांत हे डोळ्यांपर्यंतही जातो. हे 24 तासांत मेंदूपर्यंतही जातो. त्यामुळे डोळा काढावा लागत आहे.

सायनस आणि डोळे यांदरम्यान हाड असते. त्यामुळे डोळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 2 पेक्षा जास्त दिवस लागू शकतात. डोळ्यापासून मेंदूपर्यंत कोणतेही हाड नसल्याने ते थेट मेंदूपर्यंत जाते. त्यामुळे जर डोळा काढण्यास उशीर झाला तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

कमकुवत इम्युनिटी असणाऱ्यांवर हल्ला

डॉ. शाह यांनी सांगितले, की फंगल इन्फेक्शन सर्वात आधी कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्या लोकांवर हल्ला करतो. उपचारादरम्यान दिले जाणारे औषधेही शरीरावर दुष्परिणाम करु शकतात. जर रुग्णाला मधुमेह असेल तर आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त असेल. त्यामुळे असह्य दुखणे, डोळे लाल होणे, वेगाने डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचारांची गरज आहे.