CM उध्दव ठाकरेंबद्दल ‘अपशब्द’, पडलं महागात अन् झालं ‘असं’ काही

बीड : पोलीसनामा ऑनलाईन : एका शासकीय अधिकाऱ्याने शिवसेनेच्या फेसबुक पेजवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून खालच्या पातळीची टिप्पणी केली होती. ही टिप्पणी त्या शासकीय अधिकाऱ्याला चांगलीच महागात पडली असून महिला शिवसैनिकांनी भर कार्यालयात त्यांच्या अंगावर शाई फेकून तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बीड जिल्हा पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी बारा वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान या घटनेची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होताना दिसत आहे.

या अधिकाऱ्याचे नाव सुनील कुलकर्णी असून ते बीड पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी कार्यालयात जाऊन त्यांचा पाणउतारा करून त्यांच्या अंगावर शाई फेकून तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. तसेच इथून पुढे ठाकरे सरकार बद्दल अपशब्द काढला तर याद राखा असा दम देखील दिला. आणि माफी मागायला लावली. बीड पंचायत समितीत सोमवारी सभापती निवडीसाठी लोकांची मोठी गर्दी होती. या गर्दीतच पंचायत समितीच्या आवारात हा प्रकार घडला त्यामुळे सगळ्यांनी हा झालेला प्रकार बघितल्याने जिल्ह्यात सर्वत्र याची चर्चा होत आहे.

दरम्यान याआधी देखील असे प्रकार घडले आहेत. नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्यक्तीचे नाव हिरामण तिवारी असे होते. त्या व्यक्तीची शिवसैनिकांनी टक्कल करून त्याला बेदम मारहाण देखील केली होती आणि यातूनच त्या व्यक्तीच्या कानाच्या पडद्याला मोठी दुखापत देखील झाली होती. नंतर या व्यक्तीने मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागच्या नरसंहाराशी केली होती. त्या विरोधात तिवारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी हिरामण तिवारी यांची टक्कल करून मारहाण केली होती.

महाराष्ट्र राज्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. असे असून देखील शिवसैनिक सऱ्हास कायदा हातात घेऊन विरोधात बोलणाऱ्यांना सर्वांसमोर मारहाण करतात आणि खालच्या पातळीचे कृत्य करून अपमानित करतात. त्यामुळे आता प्रश्न पडलाय की या शिवसैनिकांवर कारवाई करण्यात येईल का?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/