घृणास्पद ! पुण्यात कामगारासह मालकाला मारहाण, गुप्तांगात ‘सॅनिटायझरचा स्प्रे’ मारला, पाय धुतलेल्याचे पाणी जबरदस्तीनं पाजले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कंपनीच्या कामगारालाच मालकासह तिघांनी बेदम मारहाण करून गुप्तांगात सॅनीटायझरचे स्प्रे मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर पाय धुतलेले पाणी जबरदस्तीने पिण्यास लावले आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामानिमित्त दिल्लीत असताना पैसे खर्च केले आणि त्यातुन वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरुड येथील पुणे आर्ट फेस्टिव्हल कंपनीत गेल्या 5 महिन्यापासुन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कार्यालयीन कामासाठी ते मार्च महिन्यात दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी लॉकडाऊनमुळे ते दिल्लीत अडकले. जवळचे पैसे संपल्यानंतर त्यांनी मालकाकडे पैशांची मागणी केली. मालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादी यांनी कंपनीचा लॅपटॉप हॉटेलमध्ये तारण ठेवला. पुण्यात आल्यानंतरही हॉटेलमध्ये राहावे लागले. तेथेही त्यांनी कंपनीचा मोबाईल व क्रेडिट कार्ड तारण ठेवले होते. त्यानंतर १३ जूनला फिर्यादी त्यांच्या मित्रासमवेत घोटावडे फाटा येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कंपनीचा मालक गणेश केंजळे, त्याचा ड्रायव्हर वैभव साबळे यांनी फिर्यादीस मोटारीत जबरदस्तीने बसवुन त्यांच्या कार्यालयात नेले. तेथे केंजळे, सागर शिंदे यांनी फिर्यादीस दोन दिवस डांबून ठेवत दांडक्याने मारहाण केली. चिखलाने माखलेले पाय धुण्यास सांगुन तेच पाणी पिण्यास भाग पाडले. तर साबळेने स्प्रेद्वारे सॅनिटायझर फिर्यादी तरुणाच्या गुप्तांगावर मारले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी सुटका करुन घेत कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादी यांच्यावर सध्या खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान या गुन्ह्याची सुरुवात पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे. त्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी पौड पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.