महाराष्ट्र : बलात्कारातील आरोपींना 21 दिवसांत फाशी, गृहमंत्र्यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्कारप्रकरणी महाराष्ट्र सरकार आता आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा करणार आहे. या कायद्याच्या मदतीने बलात्काराच्या घटनेतील दोषींना 21 दिवसांत फाशीची शिक्षेपर्यंत नेण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात आज (बुधवार) दिली. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत आहे. आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा आणून त्वरित न्याय मिळवून दिला जाईल. सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. राज्यात स्त्रियांना निर्भयपणे जगता यावे, हा आमचा उद्देश असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आज सांगितले.

स्त्रियांवरील अत्याचाराबाबत सरकार संवेदनशील आणि गांभीर्याने विचार करत आहे. महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी आंध्र प्रदेशमधील दिशा कायद्याप्रमाणे राज्यातही कायदा लागू केला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने मुलींवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात 25 विशेष न्यायालये आणि 27 फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली आहेत. त्या व्यतिरिक्त 43 पोलीस स्टेशन सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/