आता ‘तारक मेहता’मध्ये दिसणार नाही दयाबेन…. नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रभर हसवत राहणारी मालिका ‘तारक मेहता’ या लोकप्रिय मालिकेतून दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीची एक्झीट झाली आहे. या भूमिकेसाठी एक नव्या चेहऱ्याचा शोध चालू आहे. गेल्या काही वर्षापासून दिशा सुट्टीवर आहे. इतक्या दिवसाच्या रजेनंतर ती पुन्हा मालिकेत येण्याचे चालले होते. मात्र, मालिकेच्या निर्मात्याने तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसुद्धा दिला. पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने अखेर तिच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरु करणार अशी माहिती निर्माते असित कुमार मोदी यांनी दिली.

याआधी दिशाने सुट्टीवरुन परत येण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याचे चर्चेत होते. तीने मानधनातील वाढ करण्याबरोबरच दिशाने काम करण्याच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. दिशाचे चाहते आणि तिची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणं योग्य नाही. त्यामुळे आता तिच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

एका मुलाखतीत असित म्हणाले, ‘प्रसूती रजेनंतर अनेक महिला आठवणीने कामावर परत येतात. दिशाला आम्ही सुट्टी दिली आणि आता तिच्यासाठी आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आता आम्हाला नव्या दयाबेनचा शोध सुरू करावा लागणार आहे. प्रेक्षक दयाच्या परत येण्याची वाट पाहत आहेत आणि त्यांना आम्ही आणखी फसवू इच्छित नाही.’