7 कोटी रूपयांचा ‘ग्लोबल टिचर अवॉर्ड’ जिंकणार्‍या डिसले गुरूजींना ‘कोरोना’ची बाधा, मुख्यमंत्री, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या आले होते संपर्कात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल 7 कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर अवॉर्ड जिंकणारे सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी हे बुधवारी (दि. 9) सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांनी ही माहिती स्वत:हून व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर पोस्ट केली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर डिसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी अभिनंदन करताना त्यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान, आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनीही कोरोना चाचणी करून घ्यावी, कोणतीही रिस्क घेऊ नये, अशी विनंती डिसले यांनी केली आहे. मुंबईहून गावी आल्यानंतर त्यांना लक्षणे दिसून येत असल्याने डिसले गुरुजींनी घरातल्या सर्वांची कोरोना तपासणी केली, त्यात ते स्वत: व त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले. बाकीच्या घरातील सर्व मंडळींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

राज्य सरकारकडून आजच डिसले गुरुजींचा झाला सत्कार
दरम्यान, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 9) सत्कार करण्यात आला. यावेळी रणजितसिंह डिसले यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. वर्षा गायकवाड, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब उपस्थित होते.