‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय ! थीम पार्कमधील 28 हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं जगभर हाहाकार घातला आहे. यामुळं मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. औद्योगिक आणि मनोरंजनसह अनेक क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी डिज्नी हिनं आता आपल्या थीम पार्कमध्ये काम करणाऱ्या 28 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळं दीर्घकाळ परिणामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बहुतेक थीम पार्कमधील कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जाईल असं कंपनीनं मंगळवारी जाहीर केलं आहे.

डिज्नीचे अध्यक्ष जोश डी आमारो यांनी सांगितलं की, “हा निर्णय अत्यंत वेदनादायक आहे. परंतु कोविड 19 मुळं व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. तसेच सामाजिक अंतर, नियमांची मर्यादा, कमीतकमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि दार्घकाळापर्यंत असणारा कोरोना साथीचा रोग यांसारख्या अनिश्चिततेच्या वातावरणात कर्मचाऱ्यांची कपात हाच एकमेव पर्याय आहे” असंही ते म्हणाले.

डिज्नी आपल्या थीम पार्कमधील जवळपास 28000 किंवा कर्मचाऱ्यांपैकी एकचतुर्थांश कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल असं कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान फक्त कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामधील डिज्नीच्या थीम पार्कमध्ये कोरोनाच्या आधी सुमारे 1,10,000 कर्मचारी कार्यरत होते. आता नव्या धोरणाअंतर्गत कपातीची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या 80 हजारांच्या जवळपास जाईल.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे 7,180,411 रुग्ण आढळले आहेत आणि 2,05,774 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.