आश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे अध्यक्षाचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – सेवाग्राम आश्रमासह अन्य गांधीवादी संस्थांचे संचालन करणार्‍या सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद चिघळत चालला आहे. या प्रकरणात महादेव विद्रोही व अविनाश काकडे यांनी परस्परांविरोधात सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून चाललेली गुंडगिरी अशोभनीय असून याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असा इशारा सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिला. दोन दिवसापूर्वी ऑनलाईन सभेत काहींनी विद्रोही यांना पदावरून बरखास्त करीत कार्यकारी अध्यक्षाची नेमणूक केली. सरकारने बरबडी व अन्य भागातील काही जागा अधिग्रहित केली होती. त्याचा स्थानिक पातळीवर पाच लाख रुपयेच मोबदला मिळाल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा 21 कोटी 90 लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश झाला. यावरच डोळा ठेवून काहींनी कारस्थाने सुरू केली. मला अध्यक्षपदावरून काढण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. अशी सभा घेणार्‍यांना सभा बोलावण्याचा अधिकारच नाही. संस्थेच्या घटनेत विश्वस्तालाच सभा बोलविण्याचा अधिकार असून माझी मुदत पुढील निवडणुकीपर्यत आहे, असे ते म्हणाले. कार्यालयात माझे पैसे, विविध कागदपत्रे, सहया केलेले धनादेश ठेवलेले आहेत. त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून मी प्रथमच पोलिसांकडे गेलो. मारहाण करण्याचा माझा पिंड नाही. पैशातही मला स्वारस्य नाही. अविनाश काकडे यांनी चालविलेले प्रकार केवळ स्वार्थापोटी आहे. त्यांच्या भावाला व मित्र बारहाते यांना जागेवर कब्जा हवा आहे, असे आरोप विद्रोही यांनी केले.