आघाडीत बिघाडी, भीमा-कोरेगाव तपासावरून शरद पवार यांच्यानंतर खर्गेंची CM ठाकरेंवर ‘नाराज’

मुंबई : वृत्तसंस्था – भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा रोष ओढावून घेतला आहे. यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे. आपण महाविकास आघाडीमध्ये सहकारी आहोत. त्यामुळे यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणं अयोग्य आहे. तुमच्याकडे सत्ता असेल पण त्याचा वापर कायदेशिररित्या होणं आवश्यक असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. कोल्हापूरमधील एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. केंद्राने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्यानंतर शरद पवार यांनी त्याला विरोध केला होता. तसेच हा तपास एनआयएकडे देणं चुकीचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. केंद्राच्या निर्णयाला राज्य सरकारने पाठिंबा देणे त्याहुनही चुकीचे असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास एनआयएकडे देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाला आहे. त्यानंतर राज्य सरकारने माघार घेत तपास एनआयएकडे देण्यास सहमती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत हा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्याने यावर नाराजी व्यक्त केल्याने महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.

You might also like