शिवसैनिकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर ‘बाण’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र नांदत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरूर मतदारसंघात मात्र धुसफूस सुरूच आहे. (खासदार) डॉ. अमोल कोल्हे आणि (माजी खासदार) शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थकांत ऐन कोरोना काळात सोशल वॉर’ सुरू झालंय. या आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने मतदारसंघ गढूळ झालाय.

शिरूर लोकसभेची निवडणूक मुळात आरोप-प्रत्यारोप, जुगलबंदी, वैविध्यपूर्ण व्यंग्यचित्रे आणि खटकेबाज संवाद यांनी गाजली होती. थापाड्या-सोंगाड्या’ अशा शेलक्या विशेषणांनी प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करण्याचा त्यावेळी सुरू झालेला यज्ञ कट्टर शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या दिलेर कार्यकर्त्यांनी अखंड पेटता ठेवलाय.

लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या शिवसेनेने खासदार डॉ. कोल्हे यांना टार्गेट करत बाणांचा मारा सुरूच ठेवला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर घड्याळाचे सारेच काटे उलटे फिरल्याने आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी काहीशा थंडावल्या होत्या. दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत एकत्र आल्याने परस्परविरोधाची धारही काहीशी बोथट झाली होती.

परंतु, वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकलेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या अकार्यक्षमतेचा डंका पिटत शिवसेनेने त्यांच्याविषयी एक टीकात्मक व्यंग्यचित्र सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामुळे वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. या चित्रात, खासदार हे कोरोना काळातही मालिकांच्या चित्रीकरणात गुंतले आहेत. त्यांनी मतदारसंघ वार्‍यावर सोडला आहे, असा संदेश दिलाय.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेले हे चपखल कार्टून राष्ट्रवादीला झोंबले आहे. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा दिलाय. शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या चित्राला राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेत, जे 15 वर्षात नाही झाले, ते 15 महिन्यात डॉ. अमोल कोल्हे यांनी करून दाखविले आहे.

मतदारसंघातील अनेक प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी संसदेत केल्याने त्यांना संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. परंतु, पराभवामुळे पछाडलेले लोक सातत्याने त्यांची बदनामी करीत आहेत. ही बदनामी यापुढे सहन केली जाणार नाही, जशास तसे उत्तर देऊ, अशा आशयाचे पोस्टर सोशल मिडीयावर फिरत आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांचे कार्टून शिवसैनिकांच्या; तर जशास तसे’च्या इशार्‍याचे फलक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर फिरत आहे. भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.