पशूसंवर्धन मंत्री जानकर आणि मंत्रालयातील सचिवांमध्ये ‘जुपंली’ ; सचिवांनी केलेल्या ६६ अधिकार्‍यांच्या बदल्यांना जानकरांकडून ‘स्टे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. विधानसभेची तयारी करण्यापूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळात अंतर्गत वाद दिसून आले आहेत. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्यात शित युद्ध सुरु असल्याचे समोर आले आहे. सचिव अनुपकुमार यांनी ६६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्या मंत्री महादेव जानकर यांनी रद्द केल्या आहेत. कालपासून या घटनेवरून चर्चांना उधाण आले आहे.

अनुपकुमार यांनी केलेल्या या बदली प्रक्रियेत विश्वासात घेतले नाही, त्यामुले या बदल्या रोखल्या आहेत, असं जानकरांनी म्हणत मोठा खुलासा केला आहे.

पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्या आदेशानंतर कोकण विभागातील १४, विदर्भातील ३७ पशुधन विकास अधिकारी तसंच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दर्जाच्या १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. हे आदेश ३१ मे २०१९ रोजी पर्यंत देण्यात आले होते. या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर हजर झाल्यानंतर लगेचच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह रुजू अहवाल पशुसंवर्धन आयुक्तांकडे द्यावा, असं आदेशात म्हटलं होतं. केलेल्या बदल्यांवर नियुक्तीच्या ठिकाणावरून काही अधिकारी नाराज होते. त्यामुळे त्यांनी महादेव जानकरांकडे तक्रारही केली. मात्र आपण या प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहोत, असं सांगत झालेल्या बदल्या तातडीने रोखण्याचे आदेश त्यांना दिले.

दरम्यान, बदल्यांचे अधिकार संबधित मंत्र्यांनाच असतात. गेल्यावर्षी वर्षभरासाठी बदल्यांचे अधिकार सचिवांना दिले होते. सचिवांनी मला न विचारतातच बदल्या केल्या. माझ्यासमोर बदल्यांची फाईल आलीच नाही. काही तक्रारी आल्यावर मी चौकशी केली. त्यात या बदल्या झाल्याचं समोर आलं. त्यामुळे बदल्यांना स्थगिती दिली आहे, अशी माहिती जानकरांनी पत्रकारांना दिली आहे.