Aurangabad News : वडिलांच्या पेंशनवरून वाद, लहान भावाचा मोठ्या भावावर ॲसिड हल्ला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   वडील पेंशनमधून दरमहा मोठ्या भावाला 10 हजार रुपये खर्चाला देत असल्याचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावावर ॲसिड हल्ला करून गंभीर जखमी केले. यात घटनेत त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. रविवारी (दि. 21) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी रिजवान फकीर मोहम्मद पठाण (39 रा. मिटमिटा) याने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या निवृत्त प्राध्यापक वडिलांना दरमहा 70 हजार रुपये पेंशन मिळते. त्यांचे वडील व लहान भाऊ शादाब कॉलनीत मुज्जमिलसह राहतात. चार महिन्यांपासून तक्रारदार यांना त्यांचे वडील खर्चासाठी 10 हजार रुपये देत होते. ही रक्कम देण्यास मुज्जमिलचा विरोध होता. रविवारी रात्री 10 च्या सुमारास तक्रारदार यांना फोन आल्याने ते वडिलांना भेटायला लहान भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांच्या भावाचा सासरा निसार शेख, मेहुणा बिलाल शेख आणि वडिलांचा मानसपुत्र युसूफ शेख होते. तक्रारदार हे घरी जाताच मुज्जमिलची सासू, बायको हे तक्रारदार यांना शिवीगाळ करू लागले. याचवेळी मुज्जमिल प्लास्टिक मगमधून ॲसिड घेऊन आला आणि त्याने हे ॲसिड रिजवानच्या तोंडावर फेकले. यामुळे रिजवान मोठमोठ्याने ओरडू लागला. या घटनेची माहिती कोणीतरी छावणी पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिजवान यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.