पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र पेटणे हे क्लेशदायक : अशोक चव्हाण

नाशिक : पोलीसनामा – महाराष्ट्र पाण्यासाठी पेटू लागला आहे, ही अत्यंत क्लेशदायी बाब आहे. पाण्याच्या मुद्द्यावरून ठरावीक प्रांतापुरते न बघता महाराष्ट्र हिताचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषीथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. आ. देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेल्या मराठवाड्याला पाणी देण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील मत दिले.

चव्हाण म्हणाले, नाशिक, अहमदनगर आणि मराठवाडा यांचे पाण्यावरून जसे भांडण सुरू आहे, तसेच ते मराठवाडा आणि तेलंगणा यांच्यात सुद्धा सुरू आहे. शेती क्षेत्रात कितीही नवीन तंत्रज्ञान आणले तरीही पाणी असेल, तरच शेती फायदेशीर ठरणार आहे, याकडे सर्वांनी गांभीर्याने बघायला हवे असे आवाहन केले. ज्यावेळी जायकवाडी येथील प्रकल्प साकारण्यात आला, त्यावेळी अस्तित्वात आलेल्या कायद्यानुसारच पाणीवाटप सुरू आहे आणि हा विषय न्याप्रविष्ट असल्याने तूर्तास सगळ्यांना समान पाणीवाटप होणे आवश्यक आहे.

पाण्यावरून भांडणं न करता महाराष्ट्र एकसंध असावा, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्मांण व्हावी. भांडत बसण्यापेक्षा महाराष्ट्राचा पूर्वीचा इतिहास आठवावा. शेतकऱ्यांचे भले व्हावे हा उद्देश असला तरीही आज शेतकरी स्वत:चे सरण रचताहेत, ही दु:खद बाब आहे.
आ. फरांदे म्हणाल्या, नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाणी प्रश्नावर विविध मुद्दे उपस्थित करीत सगळ्यांचे वेधले. नाशिक जिल्ह्यात अनेक प्रगतशील शेतकरी असून, या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानदेखील अवगत आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामुळे नाशिक जिल्ह्यावर दुष्काळ ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी द्राक्षबागा, डाळिंबबागा यांच्यासाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करतात. त्याचप्रमाणे मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे सूक्ष्म पद्धतीने नियोजन व्हायला हवे.