कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ‘रस्सीखेच’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पालकमंत्र्यांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली. मात्र, या यादीत महाविकास आघाडीतल्या अंतर्गत रस्सीखेचासाठी नवे कारण बनल्याचे समोर येत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले. मात्र, त्यांनी आज कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार देत आमच्या पक्षातील सहकारी पालकमंत्री होतील असे स्पष्ट केले. यावरून आघाडीमध्ये कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरुन वर्चस्वाची लढाई होताना दिसून येत आहे.

पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या नगरमध्ये राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचे नाव पालकमंत्री म्हणून देण्यात आले. तर हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरात बाळासाहेब थोरात यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. दोन्ही नेत्यांच्या पालकमंत्रीपदामध्ये आदलाबदल केल्याने याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कोल्हापूरात काँग्रेस-राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई सुरु असल्याने त्यावर तोडगा म्हणून हा मार्ग काढल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूरमध्ये तीन मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री तर काँग्रेसचे सतेज पाटील आणि शिवसेनेच्या कोट्यातून येड्रावकर असे दोन राज्यमंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे किमान कोल्हापूरमध्ये तरी आपला पालकमंत्री असवा असा आग्रह काँग्रेसचा आहे. मात्र, सतेज पाटील यांची आक्रमक कार्यशैली राष्ट्रवादीला जिल्ह्यात अडथळा ठरु शकते. त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध सुरु झाला आहे. तर जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री असताना राज्यमंत्र्याला पालकमंत्रीपद कसे असा युक्तीवाद केला जात आहे.

कोल्हापूर हा भाजप प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असून हाच जिल्हा भाजपमुक्त झाला आहे. त्यातच सतेज पाटील यांचे ‘आमचं ठरलंय’ या पॅटर्नचाही बराच वाटा आहे. सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी हे पद सोडल्याने सतेज पाटील यांच्याकडे हे पद येणार की राष्ट्रवादी पुन्हा हट्टाने कोल्हापूर मागून नगर काँग्रेससाठी सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/