अखेर राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी स्विकारणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी अखेर राजू शेट्टी यांचे नाव सुचवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे दोन दिवस चाललेल्या संघटनेतील वादावर अखेर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी देण्यात येणार आहे. विधान परिषदेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच अशी भूमिका घेतली होती.

राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधान परिषेदवर सरकारमार्फत शिफारस करून पाठवायच्या आहेत त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या बैठकीमध्ये राजू शेट्टी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले होते, मात्र यानंतर स्वाभिमानीमध्ये धुसफूस झाली होती.

काय म्हणाले होते राजू शेट्टी
यावर राजू शेट्टी यांनी विधान परिषदेची ब्याद नको अशी भूमिका घेतली होती. काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगांना सामोरा गेलो, अनेकांचे वार झालेले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो.

समोरून झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात, अशी भावना व्यक्त केली होती. अखेर राजू शेट्टी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक यांची नाराजी दूर करण्यात आली.