अभिनेत्री कंगनाच्या बांधकामावरील कारवाईत ‘गडबड’ : उच्च न्यायालय

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामावर कारवाई करताना पालिकेने नियम धाब्यावर बसवले. त्यामुळेच या प्रकणातील पालिकेच्या कारवाईत ‘काहीतरी गडबड’ असल्याची टीका उच्च न्यायालयाने केली आहे. या प्रकरणी पालिकेने बेकायदा बांधकामावरील कारवाईबाबतच्या पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाने केलेल्या सुधारित याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर काल दिवसभर सुनावणी झाली.

न्यायालयाने पालिकेचे ‘एच’ प्रभागाचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांना बोलावून त्यांच्याकडे कंगना आणि तिच्या शेजारच्या वा परिसरातील बंगल्यांतील बेकायदा बांधकामांच्या कारवाईबाबत विचारणा केली. मात्र लाटे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाली नाहीत. उलट अन्य प्रकरणात पालिकेने काम थांबवा नोटीस बजावतानाच संबंधितांना उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला गेल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. नियमानुसार बेकायदा बांधकामवरील कारवाईआधी बेकायदा बांधकामाची छायाचित्रे काढली जातात, कारणे दाखवा नोटीस दिली जाते, त्याला उत्तर देण्यासाठी संबंधितांना वेळ दिला जातो. कारवाईच्या वेळी फार कमीवेळा पोलिसांना पाचारण केले जाते. परंतु कंगनाच्या बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामाचा विचार करता पालिकेने स्वत:च्या नियमांचे पालन केल्याचे दिसत नसल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. कंगनाप्रमाणेच आणखी एकाने बंगल्यात बेकायदा बांधकाम केले होते. त्यालाही आदल्या दिवशी कारणे दाखवा नोटीस बजावत 8 सप्टेंबरला कारवाई केल्याचा दावा पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता. त्याबाबत न्यायालयाने लाटे यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्या प्रकरणी छायाचित्रे काढण्यात आलेली नसून कारवाईचा काहीही तपशील नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हे संवदेनशील प्रकरण असल्याचे लाटे यांच्याकडून सांगण्यात आले. त्यावर सेलिबट्रींचा समावेश असलेले प्रकरण संवेदनशील असते, असा टोला न्यायालयाने हाणला.