Coronavirus : ‘सोशल डिस्टन्सिंग’मध्ये एवढं अंतर योग्य आहे का ? संशोधक म्हणतात…

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, सुरक्षित अंतर नेमके किती असले पाहिजे? एका अभ्यासात या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. बेल्जियम आणि डच संशोधकांनी एयरोडायनामिक प्रभाव लक्षात घेऊन हा अभ्यास केला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ शकतो हे याआधीच्या संशोधनातून समोर आले आहे. एखादा व्यक्ती जेव्हा शिंकतो, खोकते किंवा श्वास सोडतो तेव्हा लहानशा थेंबामधूनही उत्सर्जन होते. हे थेंब इतके लहान असतात की, ते डोळयांना दिसतही नाहीत. पण त्यातूनही व्हायरसचा प्रसार होतो.

शिंकणार्‍या, खोकणार्‍या व्यक्तीच्या जवळ तुम्ही असाल तर, श्वासावाटे ते थेंब तुमच्या शरीरात प्रवेश करतात. ते थेंब हातावर पडले असतील तर तोच हात चेहर्‍याला लावला तर करोनाची बाधा होऊ शकते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये दीड मीटर अंतर राखण्याचा व सोशल डिस्टन्सिंग पाळण्यावर भर दिला जात आहे. ड्रॉपलेट म्हणजे पाण्याचे थेंब दीड मीटर अंतरावर पोहचण्याआधी जमिनीवर पडतात. त्यामुळे तुम्ही कोरोना संक्रमणापासून स्वत:ला वाचवू शकता. बहुतांश देशांमध्ये दोन व्यक्तींमध्ये 1-2 मीटरचे अंतर राखण्यावर भर दिला जात आहे. दोन्ही व्यक्ती जेव्हा एका जागेवर स्थिर असतील त्यासाठी हे अंतर आहे. पण चालताना, धावताना किंवा बाईक चालवतान हे अंतर पुरेसे आहे का? हा विचार यामध्ये केलेला नाही.एयरोडायनामिक प्रभाव लक्षात घेतला तर पुढे जाणारा व्यक्ती शिंकला तर मागून येणार्‍या व्यक्तीला संक्रमणाची बाधा होण्याचा धोका जास्त असतो. भले त्यांच्यात 1-2 मीटर अंतर असले तरी हा धोका कायम असतो.