Lockdown 4.0 : उद्यापासून रेड झोन नसलेल्या जिल्ह्यांत धावण्यासाठी ‘लालपरी’ सज्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनाने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या आधीन राहून शुक्रवार (दि.22) पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

अनिल परब म्हणाले, 23 मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु चौथ्या कालावधीत राज्य शासनाने रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यनुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर शुक्रवारपासून एसटी बस सेवा सुरु होणार आहे.

खालील नियमांचे पालन करणे आवश्यक
1. जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच ही बस सेवा सुरु राहणार आहे.
2. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
3. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. साधारण एका बसमध्ये 20 ते 30 प्रवासी, एका सीटवर एकच प्रवासी असेल.
4. ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून)
5. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
6. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.