कौतुकास्पद ! विमल आजींसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ठरले श्रावण बाळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील विमल आजींसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे श्रावणबाळ ठरले आहेत. त्यांच्यामुळं विमल आजींचं जीवन सुखद झालं आहे. यानंतर आता जिल्हाधिकारी माझ्यासाठी देवदूत बनले आहेत अशी भावना विमल आजींनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर, सरकार काम आणि बारा महिने थांब या म्हणीलाही त्यांनी फाटा दिला आहे.

कोण आहेत विमल आजी ?

पुण्यातील विमल लोखंडे या वयाची सत्तरी गाठलेल्या विमल आजी प्रांत कार्यालयाबाहेर बसलेल्या असतात. सरकारी कामकाजासाठी प्रांत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अर्ज भरताना करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम या आजी करतात. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे प्रांत कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी विमल आजी यांच्यावर त्यांची नजर गेली. त्यांनी लेगच आजींकडे धाव घेतली. विचारपूस झाल्यानंतर आजींनीही त्यांना आपली कहाणी सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनीही एका मिनिटात त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला. आजींना जागेवरच श्रावण बाळ योजनेचा फायदा मिळवून दिला. जिल्हाधिकारी आजींसाठी खऱ्या अर्थानं श्रावणबाळ ठरले. यानंतर जिल्हाधिकारी माझ्यासाठी देवदूत बनले आहेत अशी भावना विमल आजींनी व्यक्त केली आहे.

लोकांना मदत करून मिळवतात पैसे

गेल्या 14-15 वर्षांपासून विमल आजी सरकारी कामात नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम करत आहेत. इतकंच नाही तर नागरिकांना विविध अर्ज भरण्यासाठीही त्या मदत करतात. यानंतर नागरिक जे काही पैसे देतात ते स्विकारून त्यात त्या समाधानी आहेत. पंरतु आता जिल्हाधिकाऱ्यांमुळं या आजींना श्रावणबाळ योजनेतून दर महिन्याला 1000 हजार रुपये मिळणार आहेत. विमल आजींना 3 मुलं असूनही त्या एकट्या राहतात. त्यांची काळजी घेण्यासाठी कुणीही नाहीये. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका मिनिटात त्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला.