मतमोजणीची तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा सार्वत्रिकनिवडणुक – 2019 अंतर्गत 37- अहमदनगर व 38 – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक23 मे रोजी एमआयडीसी नागापूर, अहमदनगर येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होत आहे. दक्षिणेकडील गोदाम क्रमांक 1 मध्‍ये अहमदनगर मतदारसंघाची तर गोदाम क्रमांक 3 मध्‍ये शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीसाठी नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथाजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मतमोजणीच्‍यातयारीचा प्रत्यक्ष भेट घेऊन आढावा घेतला.

गुरुवार 23 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. अहमदनगर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून क्रमाने मतमोजणीसाठी नेण्यात येतील. मतमोजणीच्या ठिकाणी सीआरपीएफचे सुरक्षा कडे असणार आहे. बाहेरील बाजूस एसआरपी आणि पोलीस बंदोबस्त राहील.

37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 54 हजार 248 आहेत यापैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी मतदान केले आहे. नगर मतदारसंघातील मतदानाची 64.26 टक्‍केवारी आहे तर 38- शिर्डी लोकसभा मतदारसंघाता एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54 टक्‍केवारी आहे. दोन्ही मतदारसंघाच्यामतमोजणीसाठी विधानसभा संघनिहाय प्रत्येकीसहा कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म ‍निरीक्षक असतील. आकडेवारी एकत्रित करण्यासाठी 12 कर्मचारी, रो ऑफिसर 6, सिलींग स्‍टाफ 36 व शिपाई 120 या प्रमाणेकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहाय्यक ‍निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

सकाळी आठ वाजता सर्वप्रथम टपाली आणि ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. टपाली मतमोजणी 8 आणि ईटीबीपीएस मतमोजणी 2 टेबलवर होणार आहे. दोन्ही प्रकारची मोजणीस सुरुवात झाल्यानंतर लगेचचईव्हीएममधील मतमोजणी करण्यास सुरुवात होईल.प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येईल. एकूण 24 ते 26फेऱ्यांमध्ये मतमोजणी होण्याची शक्यता आहे. ( अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22, संगमनेर मतदान केंद्र 280 मतमोजणी फे-या 20, शिर्डी मतदान केंद्र 273 मतमोजणी फे-या 20, कोपरगाव मतदान केंद्र 270 मतमोजणी फे-या 20, अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22,श्रीरामपूर मतदान केंद्र 310 मतमोजणी फे-या 23, नेवासा मतदान केंद्र 269 मतमोजणी फे-या 20, शेवगाव मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26, राहुरी मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22, पारनेर मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26, अहमदनगर मतदान केंद्र 292 मतमोजणी फे-या 21, श्रीगोंदा मतदान केंद्र 345 मतमोजणी फे-या 25 व कर्जत-जामखेड मतदान केंद्र 355 मतमोजणी फे-या 26)

मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणीच्यावेळी उमेदवारांच्या प्रतिनधींना उपस्थित रहाता येईल, मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक असेल.

मतमोजणीची फेरीनिहाय माहिती देण्यासाठी ध्वनीक्षेपक बसविण्यात आले आहे. ‘वोटर्स हेल्पलाईन’ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मतमोजणीची माहिती मिळू शकेल.

भ्रमणध्वनी सोबत नेण्यास बंदी
मतमोजणी प्रक्रीया सुरळीत पार पडावी व त्यात व्यत्यय येऊ नये यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी भ्रमणध्वनी सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. भ्रमणध्वनी ठेवण्याची कुठलीही व्यवस्था मतमोजणीच्या ठिकाणी असणार नाही. मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनीचा उपयोग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी भ्रमणध्वनी किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना मीडिया कक्षापर्यंत त्यांचे मोबाईल घेऊन जाता येतील.