‘त्या’ दबंग महिला अधिकार्‍यानं घेतला पदभार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – क्रीडा संघटना व राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारीपदाची सूत्रे पूर्णत: स्वीकारली आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांना पदभार देण्याचा आदेश राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने दिला आहे. राष्ट्रपती शासन असल्याने नावंदे यांच्याविरोधात नेमका कोणाकडे पाठपुरावा करायचा, असा प्रश्‍न क्रीडा संघटनापुढे पडला आहे.

क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत क्रीडा संघटना, क्रीडाशिक्षक, राजकीय नेत्यांनी तक्रार केली होती. त्यामुळे क्रीडा विभागाच्यावतीने नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तसेच त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नावंदे यांच्याविरोधात क्रीडा संघटनांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला होता. नावंदे यांना पुन्हा हजर करण्याचा आदेश दिला होता. मात्र क्रीडा संघटनांनी पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या दबावामुळे त्यांना पुन्हा रजेवर पाठवण्यात आले.

मात्र राष्ट्रपती राजवट लागू होताच नावंदे यांनी पुन्हा जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार घ्यावा, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा संघटना, क्रीडाशिक्षक व राजकीय नेत्यांना मोठी चपराक बसली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे नेमका कसा पाठपुरावा करायचा, असा पेच निर्माण झाल्याने क्रीडा संघटनांसमोर सर्व सहन करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

आज दुपारी नावंदे यांनी जिल्हा क्रीडाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. ही बाब जिल्ह्यातील क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षकांना मोठा धक्का देणारी ठरली आहे. दरम्यान, त्यांनी पदभार स्वीकारताच विविध सामाजिक संघटनांनी नावंदे यांचा सत्कार केला आहे.

Visit : Policenama.com