दिवेघाटात बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे शहरालगतच्या गावातही वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे दिवेघाट परिसरात बिबट्यासह जंगली प्राणी आणि पक्ष्यीसुद्धा मुक्त संचार करू लागले आहेत. त्यामुळे वडकी आणि फुरसुंगी परिसरातील नागरिकांमध्ये आता कोरोनाबरोबर बिबट्याचीही घबराटीचे वातावरण पसरले आहे.

लोणी काळभोरजवळील रामदरा आणि दिवेघाटातील कानिफनाथ या डोंगराळ भागामध्ये सध्या सायाळ, हरिण, मुगूंस, उदमांजर, मोर, ससे, हरीण अशा विविध प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे. या प्राण्यांबरोबर बिबड्यानेही दर्शन दिल्याने दिवे घाटातून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांबरोबर स्थानिक नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ फार कमी झाल्याने रस्त्यावर सन्नाटा पसरला आहे. दोन दिवसांपूर्वी दिवे घाटात रात्री बिबट्या फिरताना दिसला असून, बिबट्याचा वापर पुरंदर आणि हवेली तालुक्यात वाढल्याचे दिसन येत आहे. दोन्ही तालुक्यातील अनेक नागरिकांनी बिबट्या दिसला असून, नागरिकांनी दिवसा किंवा रात्री-अपरात्री शेतात किंवा रस्त्याने जाऊ नये, असाही सल्ला दिला आहे. दिवेघाट आणि रामदरा डोंगराळ परिसर असून, फुरसुंगी, लोणीकाळभोर परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर वाढला असण्याची शक्यता आहे, असेही नागरिकांनी सांगितले.

वनाधिकारी राहुल रासकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून दिवे घाट परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. या परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसेही मिळाले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, सासवडचे वनाधिकारी बादल आणि कात्रजची रेस्क्यू टीम यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री दोन वाजेपर्यंत रेस्क्यू केला. दोन दिवस घाटामध्ये दिसत होतो, तो कुठेही दिसला नाही. पाणवठ्याच्या ठिकाणीही ताजे ठसे दिसून आले नाहीत. बिबट्या घाट परिसरात फिरत असल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा कोठे लावता येईल, याबाबत दोन्ही हद्दीतील अधिकारी विचार करीत असून, लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.