पृथ्वीराज बाबांची स्थिती पिंजऱ्यातील वाघासारखी : दिवाकर रावते

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत असताना संपूर्ण देशातील कारभारावर लक्ष ठेवत असत. मात्र, त्यांना राज्यात पाठविल्याने त्यांची अवस्था पिंजऱ्यात ठेवलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केली. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गारगोटी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी अवनी वाघिणीची शिकार झाल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, देशात ५० व्याघ्र प्रकल्प आहेत. पण वाघांसाठी केवळ चार टक्केच जागा आहे. पुर्वी देशात ४० हजार वाघ असल्याची नोंद आढळते. वाघ शहरात जात नाही. तर माणसेच जंगलात जातात, असे म्हटले.

सयाजी शिंदे यांच्या भाषणातील या मुद्द्यावरून आपल्या भाषणात दिवाकर रावते यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पिंजऱ्यात अडकलेला वाघ असे म्हटले. रावते म्हणाले, पृथ्वीराजबाबा हे परदेशात शिकले. पुढे पंतप्रधानांच्या कार्यालयातूनही त्यांनी कित्येक वर्षे कामकाज पाहिले आहे. सर्व राज्यांशी संपर्क असल्याने, सर्वत्र त्यांचा मुक्तसंचार राहिला होता. पण पुढे त्यांना महाराष्ट्रात आणुन ठेवल्याने त्यांची ही अवस्था झाली आहे.

या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील शिवसेना सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार प्रकाश आबीटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सदाशिवराव मंडलिक एज्युकेशन अँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार यंदा पद्मविभूषण आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे जेष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, राज्यस्तरीय पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (सामाजिक), शैलजा साळोखे (क्रिडा), राजश्री काळे-नगरकर (कला), गणपतराव आप्पासाहेब पाटील (शेती व सहकार) आणि उज्वल शंकरराव नागेशकर (आपत्तीग्रस्तांना मदत) यांनाही गौरविण्यात आले.