“…तर शिवसेना उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही”

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा मतदारसंघावर एकहाती पकड आहे. मात्र, तरीही अनेक पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करतातच. एवढंच नव्हेतर त्यांना स्वपक्षातच अनेकदा विरोधाला सामोरे जावे लागले आहे. तरीही साताऱ्यतील उदयनराजेंची जादू काही कमी झालेली नाही. साताऱ्यात त्यांच्या उमेदवारीवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मात्र आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक घोषणा केली आहे. खरंतर ही घोषणा आहे की ऑफर, हे ठरवणे थोडे कठीणच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे जर अपक्ष निवडणूक लढणार असतील, तर त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही. शिवाय, त्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ऑफर रावतेंनी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून ते लढले तर त्यांच्या विरोधात शिवसेना नक्कीच उमेदवार देईल, असंही त्यांनी नमुद केलं आहे.

रावते यांच्या या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे शिवसेनेला उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून खासदार असण्याला काहीच हरकत नाही, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार असतील, तर सेनेला हरकत आहे, असं चित्र दिसत आहे. कारण दिलेल्या ऑफरमध्ये अपक्ष लढल्यास उमेदवार नाही आणि राष्ट्रवादीकडून लढल्यास विरोधात उमेदवार, अशी काहीशी भूमिका शिवसेनेची दिसत आहे.

दरम्यान, साताऱ्यात लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे रावतेंच्या या ऑफरची दखल उदयनराजे भोसले घेतील का, घेतल्यास त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.