Diwali : वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त आणि दिनविशेष

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाचं सावट दिवाळीवरही राहणार आहे. अनेक ठिकाणी घराघरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने तयारीला सुरुवात देखील झाली असेल. परंतु, कोरोनामुळे दिवाळीसारखा धामधुमीचा सण देखील अगदी साधेपणाने साजरा करायचा आहे. आता सुरक्षित दिवाळी साजरी करूया. दिवाळीतील सणांची तारीख आणि मुहूर्त जाणून घेऊयात.

वसूबारस
कार्तिक कृष्ण द्वादशीचा दिवस गोमातेची आणि वासराची पूजा करून साजरा केला जातो. यंदा वसूबारस ११ नोव्हेंबर (गुरुवारी) ला आहे. रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी द्वादशी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. पूजा करण्याचा मुहूर्त सायंकाळी ५. २९ ते रात्री ८. ७ मिनिटांपर्यंत असणार आहे.

धनत्रयोदशी
यंदा हा सण 13 नोव्हेंबर (शुक्रवारी) ला आहे. धन्वंतरीची पुजा करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी अपमृत्यू टाळण्याची पूजा करण्यासाठी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. ९ वाजून ३० मिनिटांनी त्रयोदशीची तिथी सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी ती ५. ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. सायंकाळी ५. २८ मिनिटांनी सुरू होऊन ५. ५९ मिनिटांपर्यंत पूजाचा मुहूर्त आहे.

नरक चतुर्दशी
दिवाळीची खरी सुरूवात म्हणजे अभ्यंगस्नान करून, कारिंटे फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वध करून सण साजरा करण्याचा म्हणजेच नरक चतुर्दशी. यंदा नरक चतुर्दशी १३ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी २. १७ मिनिटांपर्यंत असणार आहे. अनेकनदा चतुर्दशी आणि अमावस्या तिथी एकत्र येते. या वर्षी दोन्ही तिथी एकत्र आल्या आहेत.

लक्ष्मीपूजन
दिवाळीत संध्याकाळी दिवेलागणीची वेळ म्हणजे लक्ष्मीपूजनाचा काळ. या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. यावर्षी 14 नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असणार आहे. 14 नोव्हेंबरला दुपारी २ नंतर सुरू होऊन १५ नोव्हेंबर ला १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. या दिवशी शनी अमावस्या असल्याने शनीची पूजा करणे देखील लाभदायक ठरणार आहे.

गोवर्धन पूजा
भगवान श्रीकृष्णांनी गोकुळावर जे संकट आले होते त्यातून गोकुळवासीयांना वाचविण्यासाठी गोवर्धन पर्वत उचला होता. त्यामुळे या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. कृष्णाला दूध साखरेचा प्रसाद दाखवला जातो. निसर्गाची पूजा केली जाते. निसर्गाला देव मानून त्याची पूजा करा, राखण करा. हाच संदेश भगवान श्रीकृष्णांनी दिला आहे. या दिवशी अन्न दान देखील केले जाते.

भाऊबीज
या दिवशी बहीण-भावाच्या नात्याला जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी प्रार्थना केली जाते. भाऊबीजेचा शुभमुहूर्त दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुरू होऊन दुपारी ३. १८ मिनिटांपर्यंत असणार आहे. भाऊबीजेला यम द्वितीय असे देखील म्हटले जाते. या दिवशी यमाची बहीण यमी हिने आपल्या भावाकडे समस्त भावाचे प्राणाचे दान मागितले होते. ते यमाने दिले. 16 नोव्हेंबरला दिवाळी सणाची धामधूम भाऊबीजेच्या सणाने संपणार आहे.