रेग्युलर रेल्वेव्दारे प्रवास करणार्‍यांना भुर्दंड

पोलीसनामा ऑनलाइन – टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या रेल्वेकडून सुरु झाल्या असल्या तरी नियमित गाड्यांना अजूनही ‘विशेष’ दर्जा देण्यात येतो आहे. तसेच दिवाळीसाठी सुरु झालेल्या ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या सुद्धा तीन महिन्यानंतर सुरु आहेत. दोन्ही प्रकारच्या गाड्यांना अतिरिक्त तिकीट आकारले जात असून, गाड्यांना सर्वसामान्य डबेही नसतात. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्याशिवाय या गाड्यांना कसलीही सवलत देण्यात येत नाही.

टाळेबंदी शिथिल केल्यावर रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा क्रमांक बदलून त्यांना ‘विशेष’ असा दर्जा देण्यात आला. तसेच दिवाळीत ‘फेस्टिव्हल स्पेशल’ या गाड्या देशभरात सुरु करण्यात आल्या. अन्य वेळेला नियमित गाड्या सुरु असताना प्रवाशांची मागणी लक्षात घेता ‘विशेष फेस्टिव्हल स्पेशल’ आणि ‘हॉलिडे स्पेशल’ या गाड्या सोडल्या जातात. या विशेष गाड्यांचे नियोजन केले जात त्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारण्यात येतो आणि त्यात जेष्ठ नागरिक अथवा अपंगासह इतर वर्गाला देण्यात येणाऱ्या कोणत्याही सुविधा नसतात.

या गाड्यांच्या माध्यमातून जादा शुल्कासह प्रवाशांनकडून अतिरिक्त शुल्काची वसुली केली जात आहे. तसेच या गाड्यांमध्ये सर्वसामान्य श्रेणीचे डबे नसल्याने सर्वानाच वरच्या श्रेणीतील तिकीट दरातच प्रवास करावा लागतो.

याबाबत बोलताना रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शाह म्हणाल्या, सध्या धावत असलेल्या विशेष आणि फेस्टिव्हल विशेष गाड्या याआधी धावणाऱ्या गाड्या असल्याने त्या पूर्वीसारख्या नियमित कराव्या. या गाड्या किती काळापर्यंत विशेष म्हणून धावणार, हेही रेल्वेने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

विशेष गाड्यांचा भुर्दंड

>> विशेष दर्जा असलेल्या गाड्यांना नियमित तिकिटपेक्षा अधिकचे शुल्क

>> विशेष गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंगासोबत अन्य वर्गातील कोणत्याही सवलती नाही.

>> विशेष गाड्यांत सर्वसामान्य डबे नसल्याने वरच्या श्रेणीतील प्रवासाशिवाय पर्याय नाही.