कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसर्‍यालाच मिळाली दिवाळी भेट, 30.67 लाख लोकांना 3,737 कोटींचा ‘बोनस’

नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्री कर्मचार्‍यांसाठी खुशखबर आहे. अराजपत्रित केंद्रीय कर्मचार्‍यांना दसरा-दिवाळीसाठी 30.67 लाख उत्पादकता व अ‍ॅडहॉक अशा दोन प्रकारे बोनस देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्यासाठी 3,737 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कर्मचार्‍यांना बोनसची रक्कम एकाच हप्त्यात दसर्‍यापूर्वी दिली जाईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2019-20 या वर्षासाठी हा बोनस देण्याचा निर्णय घेतला गेला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, 30 लाखांहून अधिक अराजपत्रित केंद्रीय कर्मचार्‍यांना हा बोनस मिळेल. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. खरेदीचे प्रमाण वाढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन योजना जाहीर केल्या होत्या. यापैकीच एक बोनसचा निर्णय केंद्राने घेतला आहे. कोरोनाचे सावट असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, या हेतूने केंद्राने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, केंद्रीय कर्मचारी करत असलेल्या कामाशी निगडीत पीएलबी बोनसचा लाभ 16.97 लाख अराजपत्रित कर्मचार्‍यांना मिळणार आहे. यात रेल्वे, संरक्षण, पोस्ट, ईपीएफओ, ईएसआयसी आदी खात्यांतील कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. यावर 2,791 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अ‍ॅडहॉक देण्यात येणार्‍या बोनसचा फायदा 13.70 लाख अराजपत्रित कर्मचार्‍यांना होणार आहे. यासाठी केंद्राचे 946 कोटी रूपये खर्च होणार आहेत.