‘कोरोना’ला सणवार-दिवाळी कळत नाही खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतात दिवाळीमध्ये ही लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. आजपासून दिवाळी सुरू झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. दिवाळीचा आनंद घ्या; पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन राज्यातील नागरिकांना केले आहे.

ठाकरे म्हणाले की, लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहाेचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे, हे आपले प्राधान्य असले पाहिजे. हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत. हे कृपया विसरू नका. मी स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ई-मेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.