साईदरबार सोमवारी होणार खुला, सुरुवातीला केवळ 6 हजार भाविकांना दर्शन !

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने येत्या दिवाळी पाडव्याला (सोमवारी) साईमंदीर उघडण्याचा निर्णय घेत जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट (diwali-padva-sai-mandir-will-be-open) दिली आहे.राज्य सरकारच्या निर्णयाचे साईनगरीत फटाके फोडून व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले. मात्र मंदीरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे. तब्बल 242 दिवसांनी पाडव्याला साईमंदीर उघडणार आहे. सुरुवातीला केवळ 6 हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन (initially-only-6000-devotees-will-get-darshan) घेता येईल. त्यानंतर हळुहळु ही संख्या वाढवण्यात येणार आहे.

पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी केले. यावेळी डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.

65 वर्षावरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था करण्यात येईल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रूग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोना बाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधुन किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येती विषयी फिडबॅक घेतला जाणार आहे. भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदीरात जावुन दर्शन घेता येईल मात्र चावडी आणि मारूती मंदीरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल.

समाधी दर्शनानंतर बॅरिगेटींग मधुन पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदीरात हार, प्रसाद आदी पुजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पुजा, ध्यानमंदीर, पारायण कक्ष बंद ठेवले जाणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीन मध्ये चहा – बिस्कीटे मिळणार नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळुहळु भाविकांना पुर्वी प्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे.