खरेदी विक्रीत 8 महिन्यांनंतर संचारला ‘उत्साह’, दिवाळीची ‘उलाढाल’ 60 हजार कोटी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे गेली पाच सहा महिने बाजारपेठ बंद होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी काही अटी आणि शर्थींवर बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. बाजारपेठ सुरू झाली. मात्र, अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते. पण दसऱ्यानंतर दिवाळीला बाजारपेठेतील मरगळ झटकली गेली आहे. तब्बल ८ महिन्यांनंतर दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

ऑक्टोबरपासून अर्थव्यवस्था सावरू लागली असून, हळूहळू बाजारात उत्साह संचारू लागला आहे. दिवाळीत उत्साहाने टोक गाठले असून, ग्राहकही मोठ्या संख्येने बाजाराकडे वळू लागले आहेत. फटाके, मिठाई, नवीन कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टीव्ही, वॉशिंग मशीन अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठ फुलल्या असून, खरेदीसाठी ग्राहकांचीही झुंबड उडाली आहे.

दुकाने वस्तूंनी ओसंडून वाहत आहेत आणि ग्राहकही खरेदीचा उत्साह दाखवत आहेत. गेल्या आठ महिन्यांत झालेला व्यापारातील तोटा भरून निघेल, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे. निदान ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल दिवाळीच्या काळात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वदेशी वस्तूंना प्राधान्य……
दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंची रेलचेलही बाजारात आहे. सुकामेवा, मिठाई, उंची चीजवस्तू, घड्याळे, दागिने इत्यादींच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे निरीक्षण एका व्यापाराने नोंदवले. पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंची खरेदी करा, असे आवाहन केल्याने अनेकजण स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे.